॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्रीरुक्मिणी देवी उपासना मंदिर , पंढरपूर

भक्ती • प्रेम • श्रद्धा • दिव्य चरित्र

Created by- Shrikrishna L. Utpat

वर्णनांची भाषा निवडा / Choose description language
भगवान श्रीकृष्णाचे गुणवर्णन ऐकून रुक्मिणी मूर्च्छित झाल्याचा प्रसंग

भगवान श्रीकृष्णाचे गुणवर्णन ऐकून रुक्मिणी मूर्च्छित झाली.....

द्वारिकेहून कीर्तिनामा नावाचा ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांची कीर्ती घेऊन वैदर्भनंदनी रुक्मिणी मातेचे पिता भीष्मक राजाच्या राजप्रसादी आला. षड्गुणैश्वर्यसंपन्न कृष्णाचे गुण गाणारी त्याची वाणी नवरसांचा वर्षाव करीत होती. त्याच्या भक्तीने उचंबळलेल्या अंतःकरणाने देहभान हरपून केलेल्या वर्णनामुळे पिता राजा भीष्मक व श्रीरुक्मिणी मंत्रमुग्ध झाली. तिच्या हृदयी श्रीकृष्ण मूर्ती प्रकटली, बाह्य स्फूर्ती मावळली, अंगप्रत्यंग रोमांचित झाले, कंठी बाष्प दाटले आणि भक्ती-प्रेमाच्या उद्रेकाने ती मूर्च्छित होऊन धरणीवर कोसळली, तो हा प्रसंग....

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

भीष्मक राजाच्या राजसभेत रुक्मी श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाला विरोध व्यक्त करताना

रुक्मीची प्रतिज्ञा...

भीष्मक राजाला पाच पुत्र व एक कन्या रुक्मिणी होती. त्यातील ज्येष्ठ पुत्र रुक्मी होता. त्याला रुक्मिणीचा श्रीकृष्णाबरोबर होणारा विवाह मान्य नव्हता. कारण तो शिशुपाल, चक्रदंत या कृष्णशत्रूंचा मित्र होता. कृष्ण द्वेषाने पछाडल्यामुळे त्याने कृष्ण-रुक्मिणीचा होणारा विवाह नाकारून तो शिशुपालाशी करण्याचा निश्चय राजप्रासादी व्यक्त केला.

हा एक प्रसंग आणि तिच्या भावाचा निश्चय ऐकून रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णास एक पत्र लिहिले, ते पत्र सुदेव ब्राह्मणास भगवान श्रीकृष्णासाठी दिले. तेच ते चिरयातीत अमर झालेले सप्तश्लोकी पत्र! धवल रेशमी पट्ट्यावरती केशर रंगी लिहिलेले अशापरी चिरयातीत पहिले प्रेम पत्र अवतरले! हा सुद्धा प्रसंग या चित्रात रेखाटला आहे....

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

सुदेव ब्राह्मणाची आणि श्रीकृष्णाची भेट

सुदेव ब्राह्मणाची आणि श्रीकृष्णाची भेट

रुक्मिणीने दिलेले पत्र घेऊन सुदेव ब्राह्मण कृष्णाच्या द्वारिकेतील राजप्रसादी आले. ब्राह्मणांना देव मानणाऱ्या श्रीकृष्णाने राजाने विद्वानांचा मान करावा या सनातन परंपरेचा मान राखत सिंहासनावरून खाली उतरून पुढे येत हात जोडून त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांना सिंहासनावर बसवून त्यांची यथोचित साग्रसंगीत पूजा केली आणि त्यांना सर्व क्षेमकुशल विचारून त्यांना भोजन वगैरे घालून सर्व पाहुणचार व्यवस्थित केला. भगवान श्रीकृष्णाने केलेला तो सन्मान पाहून सुदेव ब्राह्मण सुखावले, तो हा प्रसंग.

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

सुदेव ब्राह्मणाकडून श्रीकृष्णास रुक्मिणीचे सप्तश्लोकी पत्र वाचून दाखविण्याचा प्रसंग

सुदेव ब्राह्मणाकडून पत्रिका वाचन

श्री रुक्मिणीने दिलेले सप्तश्लोकी पत्र सुदेव ब्राह्मण भगवंतासमोर वाचून दाखवीत आहेत. या पत्रात शुद्ध मोती ओवावेत तसे गोल टपोरे रुक्मिणीचे अक्षर असून, ते पत्र रत्नाच्या बोलाने केशराची शाई करून धवल रेशमी वस्त्रावर लिहिले होते.

तिने तिच्या मार्दव भक्तीने तिचे मन त्यात गुंफलेले होते. त्यात तिचा निश्चय, तिचे चातुर्य, तिची भक्ती, तिची प्रसंगावधानता हे सर्व असामान्य गुणवैभव प्रकटले होते. ते केवळ एक प्रेमपत्र नसून भक्ताने भगवंतास अर्पण केलेली उपास्यगुणसंयुक्तिका पत्रिका होती, हा तो प्रसंग.

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

रुक्मिणीमातेचा सुदेव ब्राह्मणास वंशपरंपरागत सेवेसाठीचा वर

रुक्मिणीमातेचा सुदेव ब्राह्मणास वंशपरंपरागत सेवेसाठीचा वर

भगवान श्रीकृष्णाला बरोबर घेऊन सुदेव ब्राह्मण कुंडिनपुरात आले आणि श्रीरुक्मिणीच्या अंतःपुरात जाऊन तिला भेटले. त्यांनी रुक्मिणीला सांगितले की भगवान श्रीकृष्ण तिच्यासाठी द्वारिकेहून आलेले आहेत. ही वार्ता ऐकून रुक्मिणी कृतकृत्य झाली. ज्याने श्रीकृष्णाला आणले, त्याच्या उपकारातून उतराई कसे व्हावे? ज्याने जन्ममरणाचा फेरा चुकविला, त्या सुदेव ब्राह्मणास काय द्यावे? असा प्रश्न रुक्मिणीस पडला. त्यावेळी तिने त्यांना नमस्कार करून वर मागण्यास सांगितले.

त्यावर सुदेव ब्राह्मण म्हणाले की, “माते, वर देणार असशील तर एकच वर दे की तुझ्या भक्तीत कधीही अंतर पडू नये, वंशपरंपरागत तुझी पूजा माझ्या वंशात सुरू राहावी, पिढ्यानपिढ्या आमच्या हातून तुझी सेवा घडावी.” श्रीरुक्मिणी मातेने “तथास्तु” म्हटल्यापासून त्या सुदेव ब्राह्मणाच्या वंशात तिची पूजा चालत आली आहे. आजचे रुक्मिणी मातेचे पुजारी आम्ही उत्पात मंडळी त्याच सुदेव ब्राह्मणाचे वंशज आहेत, तो हा प्रसंग....

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

रुक्मिणी आपल्या सख्यांसह अंबिका मंदिरात पूजनासाठी जाताना

कुलधर्मानुसार अंबिका मंदिरातील पूजन

रुक्मिणीने चातुर्याने दूताकडून पत्रात सांगितले होते की, राजा भीष्मकाच्या कुळात विवाहापूर्वी कुंडिनपुराबाहेरील अंबिकेच्या मंदिरात दर्शन घेण्याची आणि ओटी भरण्याची परंपरा आहे.

त्यानुसार रुक्मिणी सर्व सख्यांसह, दासी-दास आणि रक्षणासाठी असलेल्या सैन्याबरोबर अंबिकेच्या मंदिरात प्रवेश करते. तिथे पूजा करून देवीच्या चरणांवर डोके ठेवते आणि गळ्यातील नीलकमळांची माळ अर्पण करते. शुभशकुन झाल्याचे मानून ती आनंदाने मंदिराबाहेर येते. तिची मनोकामना पूर्ण होणार या विश्वासाने ती श्रीकृष्णाच्या आगमनाची वाट पाहते. हा अंबिका मंदिरातील प्रसंग.

कै. भागवताचार्य श्री वा.ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

श्रीकृष्ण रुक्मिणीला रथात घेऊन जाताना — श्रीरुक्मिणी हरण

श्रीरुक्मिणी हरण

रुक्मिणीच्या अंगी त्रैलोक्यातील मूर्तिमंत सौंदर्य एकवटले होते. ते सौंदर्य पाहून तेथे रक्षणासाठी आलेल्या मागध सैन्याच्या मनात वाईट भावना उद्भवित होईल, म्हणून रुक्मिणीमातेवर कोणाचीही कुदृष्टी पडू नये याकरिता मदनाने काळबाण सोडून त्यांना विद्ध केले. त्यामुळे तेथील सर्व सैन्य मूर्च्छित झाले. त्याच वेळी श्रीकृष्णाने आपला गरुडध्वज रथ मंदिरासमोर उभा केला. मध्याह्नी सूर्य आला होता, आकाशात अभिजित नक्षत्र होते, साक्षात काळ “माधवान” म्हणाला. भीमकी कृष्णाच्या मुखाकडे पाहू लागली. जीव-शिवाची भेट झाली. इतक्यात श्रीकृष्णाने आपला हात तिच्या कमरेभोवती लपेटला आणि तिला उचलून रथात घेतले, हा तो प्रसंग....

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

श्रीबलराम दादा यादवांच्या बाजूने युद्ध करताना, हातात नांगर आणि मुसळ घेऊन पराक्रम दाखवत आहेत

श्रीबलराम दादांचा युद्ध पराक्रम

कृष्णाचे हे देदीप्यमान यश जरासंधादिक राजांना सहन झाले नाही आणि मगधादिक राजांचे आणि यादवांचे तुंबळ युद्ध सुरू झाले.

त्या युद्धात बलवान यादवांनी स्वयंवरासाठी आलेल्या मगध आणि इतर सैन्याची दाणादाण उडवली. गद, चारुदेष्ण, सात्यकी, अक्रूर अशा प्रमुख यादववीरांनी त्यात विरोधी वीरांना यमसदनी धाडले.

त्यात बलरामांनी हातात नांगर धरून केलेल्या युद्धाचे वर्णन विशेष असे आहे की बलरामांनी पृथ्वीचे उखळ केले, नांगराने वीर तोडून त्याची वैरण त्यात घातली, मुसळाने त्यांचे चूर्ण केले. इतके भयंकर युद्ध केलेल्या बलरामांचे नांगर घेऊन युद्ध केल्याचा हा प्रसंग.

कै. भागवताचार्य श्री वा.ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

श्रीकृष्ण रुक्मीचा पराभव करून त्याला शिक्षा देताना

भगवान श्रीकृष्णाकडून रुक्मीला शासन

रुक्मिणी हरण करून कृष्णाने तिला समवेत आणल्यामुळे रुक्मीला मोठा अपमान वाटला. रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्याने केली होती. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्याचा वध करण्यास उद्युक्त झाले.

रुक्मिणी आपल्या भावाची ही अवस्था पाहून व्याकूळ झाली. भावाच्या अपराधामुळे त्याला मृत्युदंड मिळू नये, म्हणून तिने श्रीकृष्णांकडे विनवणी केली. क्षत्रिय धर्माला अनुसरून कृष्णाने त्याचा प्राण घेतला नाही; मात्र त्याचा अहंकार दूर करण्यासाठी त्याचे केस व दाढी कापून त्याला अपमानित केले. हा रुक्मीला शासन केल्याचा प्रसंग.

कै. भागवताचार्य श्री वा.ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

सीमांत पूजनाने विवाह विधीस आरंभ — श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहातील विधी

सीमांत पूजनाने विवाह विधीस आरंभ

रुक्मिणीचे पिता श्री भीष्मक राजा आणि माता राणी शुद्धमती वऱ्हाड घेऊन द्वारिकेजवळील विवाहस्थळी म्हणजे मूलमाधव क्षेत्री दाखल झाले. तिथल्या विवाह मंडपाची रचना प्रत्यक्ष देवशिल्पी विश्वकर्म्याने केली होती. त्यामुळे तो विवाहमंडप रुक्मिणी-कृष्णाच्या अद्वितीय सौंदर्याला आणि ऐश्वर्याला शोभणारा होता.

रुक्मिणीचे माता-पिता विवाहविधीस आरंभकर्ते झाले. त्यातील आरंभाचा विधी म्हणजे सीमांत पूजनाचा विधी. या विधीमध्ये वराची श्रीविष्णू म्हणून पूजा केली जाते. त्यास बहुमोल वस्त्रे व अलंकार समर्पित केले जातात.

राजा भीष्मक आणि राणी शुद्धमती या उभयतांचे कोटी जन्मांचे परमभाग्य असे की रुक्मिणी त्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे प्रत्यक्ष श्री लक्ष्मीपती विष्णूची कृष्णरूपात जावई म्हणून पूजा करण्याचे सौभाग्य लाभले, तो हा प्रसंग....

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

रुखवत अर्पण आणि कृष्ण भोजन — विवाहानंतर श्रीकृष्णाला भोजन वाढण्याचा प्रसंग

रुखवत अर्पण आणि कृष्ण भोजन

विवाह विधी अत्यंत उत्साहात सुरू होते. प्रथमप्रमाणे रुखवत अर्पण विधी सुरू झाला. राणी शुद्धमतीने रुखवताची मांडणी कलात्मक रितीने केली होती. भगवान श्रीकृष्ण मध्यभागी बसले होते. श्रीकृष्णांच्या एका बाजूला भगिनी सुभद्रा आणि दुसऱ्या बाजूला बलराम दादांची भार्या सौ. रेवती बसल्या होत्या. तसेच इतर यादव स्त्रियाही त्या पंक्तीला जेवायला बसल्या होत्या. राणी शुद्धमती आणि राजा भीष्मक हे त्यांना आग्रह करून वाढत होते.

ताटात पक्वान्ने वाढली होती. पेय (दुधासारखे), भोज्य (भातासारखे), भक्ष्य (पोळीसारखे), लेह्य (मधासारखे), चोष्य (चिंचेच्या रसासारखे) आणि चोष्य-पेय यांसारख्या सर्व पदार्थांची रेलचेल होती.

शुद्धमतीने भगवानांना विनंती केली की, “हे यदुकुळा, रुखवताचा स्वीकार करावा.” त्यांचा भक्तिभाव पाहून भगवान संतोषले, तो हा प्रसंग...

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

सुमुहूर्त सावधान — विवाहमंडपात श्रीकृष्ण रुक्मिणीला वरमाला घालताना

शुभ मुहूर्त सावधान !!

माघ शुद्ध पंचमीस विवाह मंडपी उत्तम मुहूर्तावर लग्नघटिका समीप आली. मंगलाष्टके संपली, अंतरपाट दूर झाला. रुक्मिणीच्या माथ्यावर कृष्णाने अक्षदा टाकल्या. पण काय आश्चर्य? तिला आंतरबाह्य सभोवार सर्वत्र कृष्ण दिसू लागला. त्यामुळे तिला कृष्णाला माळ घालावी हे न कळल्याने ती स्तब्ध राहिली.

तिची स्थिती जाणून भगवान श्रीकृष्णांनी हस्तस्पर्शाने तिची भावसमाधी उतरवली आणि तिने कृष्णास माळ घातली. मांगल्य आणि पवित्रता यांचा संगम झाला. तिलारूपता आणि प्रभुता एकत्र आली. कृष्णरूप सागराला रुक्मिणीरूप गंगा मिळाली, तो हा प्रसंग...

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

कृष्ण-रुक्मिणी विवाह वरात — श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हत्तीवरील अंबारीत विराजमान होऊन द्वारिकेतून निघालेली वरात

कृष्ण-रुक्मिणी विवाह वरात

सनातन धर्म परंपरेनुसार विवाहविधीनंतर वधू-वरांची वरात निघाली. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीसह हत्तीवर अंबारीत विराजमान झाले होते. श्रीमती यादवांची मांदियाळी होती. वधू-वरांवर पुष्पवर्षाव होत होता. सारे द्वारिका नगर शृंगारले होते.

वरातीच्या मार्गावर सर्वत्र गुड्या-तोरणे-पताका उभी केली गेली होती. सर्वत्र चंदनाच्या पाण्याचा सडा शिंपला होता. चौकाचौकात द्वारिकेतील स्त्रिया ओवाळण्यासाठी दाटी करून उभ्या होत्या. जागोजागी मंगल वस्त्रांचा सुगंध दरवळत होता. वधू-वरांना पाहण्यासाठी खूप गर्दी लोटली होती. कारण स्वतः परमब्रह्म माये सहित मिरवीत आले होते, तो हा प्रसंग....

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वधू-वर म्हणून राजवाड्यात गृहप्रवेश

वधू-वरांचा गृहप्रवेश

वरात संपन्न होऊन वधू-वर राजवाड्याच्या द्वारात आले. स्त्रियांनी निंबळोण उतरवून टाकले. कृष्णभगिनी सुभद्रेने भाताची मूठ ओवाळून टाकली. दासींनी वधू-वरांचे पादप्रक्षालन केले व त्यांना वस्त्रालंकार दिले. उंबरठ्यावर ठेवलेले धान्याचे माप रुक्मिणीने कृष्णाचा आधार घेत उजव्या पायाने उलटले व मंगल गृहप्रवेश केला, तो हा प्रसंग...

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण

फलश्रुती आणि समर्पण — श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचे चित्ररूप चरित्र

फलश्रुती आणि समर्पण

ही कथा प्रत्यक्ष भगवान व्यासांनी श्रीमद्भागवतात दशमस्कंधात संक्षेपात वर्णिली असली तरी तिचा विस्तार शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी व पुढे कवी नरेंद्र, कवी सामराज, प.पू. स्वामी वरदानंद भारती (आचार्य अनंतबुवा आठवले) आणि वै. भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी केला आहे. या सर्वांचा आधार व मार्गदर्शन घेऊन वै. श्री कल्याणजी शेठजी यांनी लघुचित्रे आणि श्री परागजी घळसासी यांनी महाचित्रांमध्ये हे चरित्र प्रसंगरूपाने विस्तरले आहे.

याचे पठण, चिंतन, मनन आणि निदिध्यास भक्तिभावपूर्वक श्रद्धेने केल्यास कृष्ण-रुक्मिणीचा कृपाशीर्वाद का प्राप्त होणार नाही? ही चित्ररूपी स्वयंवर कथा पाहणाऱ्यास परम आनंद देणारी आहे. ती अलौकिक आहे, महापापे जाळून टाकणारी आहे. ही कथा म्हणजे मुमुक्षूची कुलदेवता आहे. या कथेच्या कृपेने कल्पतरू बहुलता आहे, चिंतामणी हाती आला आहे किंवा साक्षात कामधेनू प्रसन्न झाली आहे.

जीव-शिवाची गाठ सोडणारी ही कथा नित्यश्रवणात अशी आहे. या कथेत प्रत्यक्ष रुक्मिणीमातेची कृष्णप्राप्तीची इच्छा पूर्ण झाली, तर मग आपली का होणार नाही? इति श्री रुक्मिणी-कृष्णार्पणमस्तु ॥

वै. भागवताचार्य श्री वा. ना. उत्पात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चित्ररूप चरित्र अर्पण